About EMS 2027

European Marathi Sammelan

युरोपातील मराठमोळे "अपूर्वरंग"

Illustration of EMS host cities from 1998 to 2027, shown as floating diyas leading up to Germany 2027

संकल्पना: मृण्मयी जालगांवकर | AI generated

एक वारसा

The Heritage

१९९८ साली नेदरलँड्समध्ये युरोपीय मराठी संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली. तो काळ वेगळाच होता — भारतीय रेस्टॉरंट्स फारच कमी, मराठी कुटुंबं युरोपभर विखुरलेली आणि आपली भाषा, सण-उत्सव किंवा संस्कृती एकत्र साजरी करण्याच्या संधीही मर्यादित. त्या काळी स्वर्गीय डॉ. पांडव यांनी एका स्वप्नाचे बीज पेरले. युरोप आणि युनायटेड किंगडम मधील समविचारी व उत्साही मराठी बांधवांनी त्या बीजाचे प्रेमाने संगोपन केले. "घरापासून दूर राहिलो तरी आपल्या मुळांपासून दूर जायचं नाही" या भावनेतून अंकुरलेले हे स्वप्न कालांतराने विस्तारत गेले आणि आज युरोपियन मराठी संमेलनाच्या रूपाने एका विशाल, बहरलेल्या वटवृक्षात परिवर्तित झाले आहे.

युरोपियन मराठी संमेलन — एक असे व्यासपीठ, जिथे युरोपभरातील मराठी बांधव एकत्र येतात, आपली भाषा, संस्कृती आणि परंपरा साजऱ्या करतात, तसेच परदेशातही एक आपुलकीचे आणि आधार देणारे विस्तारित मराठी कुटुंब निर्माण करतात. एका छोट्याशा कल्पनेतून रुजलेला हा उपक्रम आज दर दोन वर्षांनी युरोप आणि युनायटेड किंगडममधील विविध शहरांमध्ये भरत राहणारी एक जिव्हाळ्याची आणि अभिमानास्पद परंपरा बनली आहे.

उराशी धरलेल्या स्वप्नाला पूर्ण करण्यात अनेक देशांतील मराठी कुटुंबांनी आपले श्रम, वेळ, आणि प्रेम अर्पण करून संमेलनाचा पाया अधिकाधिक भक्कम केला आणि म्हणूनच गेल्या २८ वर्षांत EMS हा केवळ एक कार्यक्रम राहिलेला नाही; तर तो युरोपभर पसरलेल्या मराठी अस्मितेचा रंगोत्सव बनला आहे. प्रत्येक संमेलनात ५०० ते ७०० सहभागी एकत्र येतात; तरीपण या ४८ तासांच्या सोहळ्याचा आत्मा आजही तसाच आहे — मराठीपण जपण्याचा, जगण्याचा आणि आनंदाने साजरं करण्याचा.

रंगीबेरंगी पारंपरिक पेहराव, मराठी भाषा, साहित्य, संगीत, नाटक, सांस्कृतिक कार्यक्रम आणि अस्सल महाराष्ट्रीय पदार्थ — हे सगळं जेव्हा युरोपच्या भूमीवर एकत्र अनुभवायला मिळतं तेव्हा परदेशात असूनही मन पुन्हा आपल्या मातीत जाऊन पोहोचतं.

"घरापासून दूर राहिलो तरी आपल्या मुळांपासून दूर जायचं नाही" — याच भावनेतून युरोपियन मराठी संमेलनाचा जन्म झाला.

या प्रवासात ह्या संमेलनाने अनेक सुंदर क्षण अनुभवले — युरोपात वाढलेल्या नव्या पिढ्या अभिमानाने मराठमोळ्या संस्कृतीशी घट्ट जोडल्या गेल्या, ओळखींचं रूपांतर आयुष्यभराच्या मैत्रीत झालं आणि संपूर्ण युरोपात मराठी लोकांचं एक सशक्त नेटवर्क निर्माण झालं. त्यामुळेच युरोपीय मराठी संमेलन आज केवळ एक कार्यक्रम नसून सीमेपलीकडील मराठी मनांना जोडणारी एक प्रखर भावना झालेली आहे.

कल्पना करा — एका छताखाली शेकडो मराठी माणसं एकत्र आलेली आहेत... अगदी एखाद्या मोठ्या मराठमोळ्या लग्नसोहळ्यासारखं उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरण! कोणी कार्यक्रमांच्या तयारीत, कोणी सादरीकरणांच्या सरावात, कोणी जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्यात, तर कोणी नव्या ओळखी जुळवण्यात रमलेलं… आणि या सगळ्यासोबत महाराष्ट्राचे रंग, गाणी, हास्यजत्रा आणि खाद्यपदार्थ अनुभवायला मिळणं.

काय मग, आपणही या सुंदर परंपरेचा भाग बनण्यासाठी सज्ज आहात ना? चला तर मग - हा आपलेपणा, मराठी अस्मितेचे रंग आणि युरोपातील मराठमोळ्या संस्कृतीचा हा प्रवास अधिक समृद्ध करुया. नाती, संस्कृती आणि आपलेपणाचा हा समृद्ध वारसा युरोपीय मराठी संमेलन २०२७ च्या माध्यमातून बाद नाऊहाइम, जर्मनी येथे पुढे सुरू राहणार आहे. आपल्या उपस्थितीची आम्ही मनःपूर्वक अपेक्षा करतो आणि आपले हार्दिक स्वागत करतो!

आमची समिती

Meet the team — with the Bürgermeister of Bad Nauheim

EMS 2027 core team with the Bürgermeister of Bad Nauheim
मुख्य समिती (Core Team) बाद नाऊहाइमच्या महापौरांसह
EMS 2027 organizing team with the Bürgermeister of Bad Nauheim
आयोजन समिती (Organizing Team) बाद नाऊहाइमच्या महापौरांसह

आपल्या उपस्थितीची आम्ही मनःपूर्वक अपेक्षा करतो!

बाद नाऊहाइम, जर्मनी | २५-२७ जून २०२७

नोंदणी करा
Trinkkuranlage, the historic drinking-cure pavilion in Bad Nauheim, surrounded by flower gardens

ट्रिंककुरअनलागे, बाद नाऊहाइम

स्थळ

The Location

युरोप म्हणजे दोन महायुद्धांच्या इतिहासातून तावून-सुलाखून जपलेली वास्तुकला. लाल आणि करड्या कौलारू छपरांची टुमदार घरे, खिडक्यांत उमललेली फुलं, भव्य राजवाडे आणि शांत, कालातीत चर्चेस. उन्हाळ्यात हिरवागार आणि हिवाळ्यात शुभ्र बर्फाने नटलेले पर्वत, निळ्याशार तलावांत उमटणारी झाडांची प्रतिबिंबे — इथे निसर्ग केवळ दिसत नाही, तर तो अनुभवता येतो.

युरोपच्या विस्तीर्ण नकाश्यात शांतता, शिस्त, तंत्रज्ञान, संशोधन आणि परंपरा यांचा अनोखा मेळ असलेला एक प्रदेश म्हणजे जर्मनी (Germany). निसर्गाशी घट्ट नातं जपणारी शहरं, टुमदार वस्ती आणि प्रत्येक ऋतूत बदलत जाणारा परिसर यामुळे हा प्रदेश अधिकच जिवंत भासतो.

अशाच शांत आणि देखण्या वातावरणात वसलेला जर्मनीतील एक रम्य गाव — बाद नाऊहाइम (Bad Nauheim). आरोग्यदायी वातावरण, झाडांनी वेढलेले रस्ते आणि युरोपीय गावाची संथ, शांत लय यामुळे हे ठिकाण पहिल्याच क्षणी मनात घर करतं. याच गावाच्या कुशीत, हिरवाईने वेढलेलं आणि निसर्गाशी एकरूप झालेलं एक खास ठिकाण म्हणजे संमेलनाचे आयोजनस्थळ — Dolce Jugendstil-Theater. हे थिएटर चार तारांकित Hotel Dolce by Wyndham, Bad Nauheim च्या परिसरात असून, हिरव्यागार बागांच्या सान्निध्यात वसलेले हे आधुनिक, प्रशस्त आणि अभिजात हॉटेल संमेलनाच्या अविस्मरणीय सोहळ्यासाठी एक सुंदर पार्श्वभूमी ठरणार आहे. वळणदार रस्त्यांमधून पुढे जाताना हे ठिकाण दिसताच त्याचं भव्य प्रवेशद्वार जणू आपलं स्वागत करतं.

Sprudelhof Therme, the spa gardens and thermal baths in Bad Nauheim
स्प्रुडलहोफ थर्मे बाद नाऊहाइमची स्प्रुडलहोफ थर्मे
A glass being filled with mineral water at the historic Kurbrunnen spring in Bad Nauheim
कुरब्रुनन शहरातील नैसर्गिक खनिज पाण्याचा झरा
युरोपीय मराठी संमेलन २०२७ हा केवळ एक सांस्कृतिक सोहळा नाही, तर जर्मनी आणि युरोपच्या सौंदर्याचा अनुभव घेण्याची एक सुवर्णसंधी आहे.

या निमित्ताने आपल्या परिवारासोबत जर्मनीतील निसर्गरम्य शहरं, ऐतिहासिक स्थळं, युरोपीय वास्तुकला, स्थानिक बाजारपेठा आणि अविस्मरणीय पर्यटनस्थळं अनुभवण्याचा आनंद जरूर घ्या. बाद नाऊहाइम (Bad Nauheim) आणि फ्रांकफुर्ट (Frankfurt) परिसर तर युरोपची सफर सुरू करण्यासाठी एक सुंदर प्रवेशद्वारच मानला जातो.

२५, २६ आणि २७ जून २०२७ या तीन दिवसांत सनई-चौघड्यांच्या मंगल निनादात, ढोल-ताशांच्या थरारात, टाळ-मृदंग आणि लेझीमच्या गजरात युरोपच्या या शांत भूमीत मराठी संस्कृतीचा भव्य सोहळा साजरा करण्यासाठी आपण सर्वांनी सहभागी व्हावे.

Bad Nauheim शहर दर्शन – मोफत मार्गदर्शित फेरी

EMS 2027 च्या सहभागींसाठी Bad Nauheim शहर प्रशासनातर्फे (Stadt Bad Nauheim) या निसर्गरम्य आणि प्रसिद्ध आरोग्यनगरीची ओळख करून देणारी, सुमारे १ तासाची मोफत मार्गदर्शित शहर दर्शन फेरी इंग्रजी भाषेत खास आयोजित करण्यात येत आहे.

  • दिवस व दिनांक: शुक्रवार, २५.०६.२०२७
  • वेळ: दुपारी १:०० वाजता (CEST)
  • कालावधी: अंदाजे १ तास
  • भाषा: इंग्रजी
  • शुल्क: मोफत

सहभागींच्या प्रतिसादानुसार व मागणीनुसार EMS 2027 च्या इतर दिवसांमध्येही अतिरिक्त शहर दर्शन फेऱ्या आयोजित केल्या जाऊ शकतात.

या फेरीत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे. नोंदणीसाठी European Marathi Sammelan 2027 च्या नोंदणीवेळी वापरलेले संपूर्ण नाव (Full Name) आणि तिकीट क्रमांक (Ticket Number) नमूद करून आमच्या टीमशी info@ems2027.de या ई-मेलवर संपर्क साधावा.

जागा मर्यादित आहेत! त्यामुळे लवकरात लवकर आपली नोंदणी करून बॅड नौहाइम शहराचे आकर्षण, समृद्ध इतिहास आणि सुंदर निसर्गरम्य परिसर अनुभवण्याची ही खास संधी नक्की साधा!

A guided tour group around the historic Kurbrunnen fountain in Bad Nauheim
मार्गदर्शित शहर दर्शन बाद नाऊहाइममधील मोफत शहर फेरी
Bronze statue of Elvis Presley in Bad Nauheim
एल्विस प्रेस्ली कांस्य पुतळा बाद नाऊहाइम

शहराचे स्वागत

Warmly hosted by the City of Bad Nauheim

EMS 2027 core team with the Bürgermeister of Bad Nauheim at the Dolce by Wyndham venue
बाद नाऊहाइम शहर युरोपीय मराठी संमेलन २०२७ चे मनःपूर्वक स्वागत करते महापौरांसह संमेलन समिती, Dolce by Wyndham येथे

टीप: बाद नाऊहाइम आणि Dolce by Wyndham यांची अधिक अधिकृत छायाचित्रे लवकरच जोडली जातील.

उत्सवाचा माहौल

The town comes alive in summer

An evening summer concert and dance in Bad Nauheim, with crowds gathered under a lit pavilion
उन्हाळ्याच्या संध्याकाळी बाद नाऊहाइमचा उत्सवी माहौल

आपल्या उपस्थितीची आम्ही मनःपूर्वक अपेक्षा करतो!

बाद नाऊहाइम, जर्मनी | २५-२७ जून २०२७

नोंदणी करा

अपूर्वरंग

The Theme

मंडळी, पाश्चिमात्य भूमीवर पाऊल ठेवताना आपण एका नव्या प्रवासाची सुरुवात करतो. नवीन भाषा, नवी माणसं आणि नवी संस्कृती यांच्याशी एकरूप होत असताना आपलं जग अधिक विस्तारत जातं. या नव्या क्षितिजांना आपलंसं करताना मराठी भाषा, महाराष्ट्राच्या आठवणी आणि आपल्या सण-उत्सवांची ओढ आपल्याला पुन्हा आपल्या माणसांकडे ओढून नेत राहते. म्हणूनच, युरोपात आपल्या मातृभूमीपासून दूर असलो तरी मनाने आपण नेहमीच घट्ट जोडलेले राहतो.

हळूहळू काही मराठी चेहरे भेटतात, गाठीभेटी जुळतात आणि त्या ओळखींच्या धाग्यांनी नाती विणली जातात. दूरदेशातही आपलेपणाची एक ऊब हळूच मनात घर करू लागते. मग गुढीपाडवा, गणपती, दिवाळी असे सण एकत्र साजरे होऊ लागतात. अशा क्षणांना हळूहळू अर्थ प्राप्त होतो आणि आठवणींना नवे रंग चढत जातात. या छोट्याशा भेटींचे रूपांतर एका जिव्हाळ्याच्या सोहळ्यात होते — आणि त्या स्नेहबंधांतूनच जन्म होतो संमेलनांचा.

या संपूर्ण प्रवासात आपण केवळ आपल्या परंपरांचा वारसा जपत नाही, तर नव्या संस्कृतींशी संवाद साधत, नव्या नात्यांच्या ओलाव्यात आणि अनुभवांच्या रंगांत अधिक समृद्ध होत जातो.

जुने आणि नवे, आपले आणि युरोपचे असे सर्व रंग एकत्र मिसळून जो एक अद्भुत संगम उभा राहतो, तोच म्हणजे "अपूर्वरंग".

या वर्षीच्या संमेलनाची ही संकल्पना पु. ल. देशपांडे यांच्या "अपूर्वाई" आणि "पूर्वरंग" ह्या अजरामर प्रवासवर्णनांवरून प्रेरित आहे. पु.लं.नी युरोपकडे केवळ एका प्रवाशाच्या नजरेतून पाहिलं नाही, तर तिथल्या माणसांमध्ये, संस्कृतीत, अनुभवांत आणि जगण्याच्या रंगांत स्वतःला सामावून घेतलं. त्यांच्या लेखणीतून उलगडणारी ती उत्सुकता, आपलेपणाने नव्या जगाकडे पाहण्याची दृष्टी आणि प्रत्येक अनुभवात सौंदर्य शोधण्याची वृत्ती — हाच 'अपूर्वरंग' चा आत्मा आहे.

जसं 'अपूर्वाई' आणि "पूर्वरंग" मध्ये प्रवास हा केवळ स्थळांचा राहत नाही, तर मनांचा आणि अनुभवांचा होतो; तसंच आपल्या सगळ्यांच्या युरोपातील प्रवासालाही अनेक रंग लाभले आहेत — आठवणींचे, नात्यांचे, संघर्षांचे, यशाचे, आणि आपल्या मराठीपणाला जपत नव्याने फुलत जाणाऱ्या आयुष्याचे. 'अपूर्वरंग' म्हणजे या सगळ्या रंगांचा उत्सव —

आपल्या मुळांशी जोडलेलं राहून नव्या क्षितिजांना सामोरं जाण्याचा, आपलेपण जपत विविधतेला कवेत घेण्याचा, आणि युरोपच्या भूमीवर मराठी संस्कृतीचे नवे रंग खुलवण्याचा एक सुंदर अनुभव.

आपल्या उपस्थितीची आम्ही मनःपूर्वक अपेक्षा करतो!

बाद नाऊहाइम, जर्मनी | २५-२७ जून २०२७

नोंदणी करा